नरेंद्र अच्युत दाभोलकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ – ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. नरेंद्र हे, अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.
नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
सामाजिक कार्य :
बाबा आढाव यांच्या एक गाव – एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.
साहित्य :
- अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम – राजहंस प्रकाशन
- अंधश्रद्धा विनाशाय – राजहंस प्रकाशन
- ऐसे कैसे झाले भोंदू – मनोविकास प्रकाशन
- ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक – लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे साडेचारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.
- झपाटले ते जाणतेपण – संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
- ठरलं… डोळस व्हायचंय – मनोविकास प्रकाशन
- तिमिरातुनी तेजाकडे – राजहंस प्रकाशन
- दाभोलकरांच्या दहा भाषणांची सी.डी.
- प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे – डी.व्ही.डी, निर्माते – मॅग्नम ओपस कंपनी.
- प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) – राजहंस प्रकाशन
- भ्रम आणि निरास – राजहंस प्रकाशन
- मती भानामती – राजहंस प्रकाशन (सहलेखक माधव बावगे)
- विचार तर कराल? – राजहंस प्रकाशन
- विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी – दिलीपराज प्रकाशन
- श्रद्धा-अंधश्रद्धा – राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)
विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी :
विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे. प्रस्तावनेत डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चतु:सूत्री दिली आहे. ती अशी,
- शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे,
- वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे व त्याआधारे विविध घटना तपासणे,
- धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणे म्हणजे धर्माबाबत काही आकलन व धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टिकोन रुजवणे,
- व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे, सजग करणे,
ही चतु:सूत्री मनात ठेवून या पुस्तकातील सर्व लेखांकडे वाचकांनी पहावे, असे या प्रस्तावनेत नमूद केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे. पुस्तकात छत्तीस लेख आहेत.
पैशाच्या पावसाच्या लोभापायी नांदोस येथे घडलेल्या हत्याकांडाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात डॉ. दाभोलकर लिहितात, ‘शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे व ओपीनियन लीडर यांनी कणखर कृतिशील भूमिका घेण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर आणखी काही बाबींचे अवधान राखावयास हवे. संयम शिकवणारा धर्म आज आंधळ्या अतिरेक्यांच्या मुठीत कैद झाला आहे. एका बाजूला कथित धार्मिकतेला उदंड उधाण आलेले, तर दुसरीकडे सर्वच धर्मानी उद्घोषिलेली नीतितत्त्वे मात्र सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे खुरडत चाललेली. असे का घडत आहे, का घडवले जात आहे, याचाही विचार करावयास हवा. हे चित्र बदलण्यासाठी प्रबोधनासोबतच एका व्यापक समाज परिवर्तनाची गरज आहे. उघडपणे शोषणावर आधारलेल्या व्यवस्थेने ज्या समाजाचा पाया रचला आहे, त्या समाजातील माणसाच्या मनाचे उन्नयन करणे, हे चर्चेने घडणारे काम राहत नाही. त्यासाठी शोषण संपवून व सृजनशील जीवन शक्य होईल, अशा समाज-व्यवस्था निर्मितीचे आव्हानही पेलावे लागेल, याचे भानही आवश्यक आहे’ हे विवेचन फार महत्त्वाचे आहे. शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, ओपीनियन लीडर, सुशिक्षित असणारा मध्यमवर्ग, वेगवेगळ्या पदांवरील उच्चशिक्षित, इंजिनिअर, डॉक्टर, वकील वगैरे व्यक्तींनी सभोवतीच्या अंधश्रद्धेच्या दूषित पर्यावरणाची सखोल चिकित्सा केली पाहिजे. आपण अंधश्रद्धा शोषणाच्या व्यवस्थांना खतपाणी घालत आहोत का? या व्यवस्थेचा आपण घटक आहोत का, हे समजून घेतले पाहिजे, हे भान या पुस्तकातील या लेखासह इतरही लेख वाचताना येते.
‘बाळू मामाची नवसाची मेंढरं’ या लेखात अंधश्रद्धांच्या संदर्भातील मानसिक गुलामगिरीची बेडी माणसांच्या मनात किती घट्ट बसली आहे, त्याचे प्रत्यंतर येते. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव, चमत्कार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, हे नाते प्रकाश अंधारासारखे आहे. एकाचे असणे म्हणजे अपरिहार्यपणे दुसऱ्याचे नसणे.. मानसिक गुलामगिरीची सर्वात भयानकता ही की त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही मग तो पडणे तर दूरच राहिले. व्यक्तीचे बुद्धिवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचारांची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे गहाण पडतात. व्यक्ती परतंत्र बनते. परिवर्तनाची लढाई मग अधिक अवघड बनते. म्हणूनच जनमानस शोधक, निर्भय व कृतिशील बनवून ते व्यापक परिवर्तनाच्या चळवळींसाठी तयार करावयास हवे’ [५] हे मनापासून समजून घेणे हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असेल, तेव्हा प्रत्येकाने आपण स्वत:वरचा विश्वास गमावला आहे का, ते प्रामाणिकपणे तपासून पाहण्याची गरज आहे. ‘मानसिक गुलामगिरीचे गडेकोट’ हा लेख या संदर्भात लक्षणीय आहे. अघोरी अंधश्रद्धांबाबत कायदा करण्याची गरज आहे, पण ‘पुरोगामी’ म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रास असा कायदा करणे कसे अवघड आहे, त्याची हकीकत तीन लेखांमध्ये सांगितली आणि धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करण्यासंदर्भात महाराष्ट्रात कसे मौन बाळगले गेले आहे, त्याची मीमांसा काही लेखांमधून केली आहे. सुशिक्षित आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी हे लेख आवर्जून वाचावेत.
‘विरोध धर्माला नसून धर्मवादाला’ आणि ‘माझी धर्मनिरपेक्षता’ हे दोन लेख वेगळे आहे. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबाबतची भूमिका आणि डॉ. दाभोलकरांची धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातली भूमिका या दोन लेखांमधून कळते.
‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’, ‘सामाजिक समतेचे मन्वंतर घडविणारी वारी’, या लेखांमधून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या आकांडतांडवाची चिकित्सा आणि पंढरपूरच्या वारीने सामाजिक समतेचे मन्वंतर कसे घडू शकते, याचीही चिकित्सा केली आहे, तर एका लेखात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या यशापयशाची चिकित्सा केली आहे. शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन हे तीन घटक विवेकवादाचे सामाजिक आधार कसे ठरू शकतात, ते विशद केले आहे. ‘विवेकवादी चळवळ: उद्याची आव्हाने’ या लेखात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी, सामाजिक सुधारणा व मानवतावाद याचा पाठपुरावा हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे भारतीय घटनेत सांगितले आहे. शिक्षण, प्रसारमाध्यमे, प्रशासन या तीनही स्रोतांसह वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष अंगीकारणाऱ्या प्रत्येक माणसाने घटनेतील या कर्तव्यपालनाबाबत आग्रही असण्याचे आवाहन पुस्तकात केले आहे.
दाभोलकरांच्या संस्था :
- अंधश्रद्धा निर्मूलन समिती
- परिवर्तन
- साधना (साप्ताहिक)
मृत्यू :
नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर(प्रचलित नाव ओंकारेश्वर पूल) अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालंगधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत.
मंगळवार २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी घरून निघाल्यावर दाभोलकर शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोळकर घटनास्थळीच कोसळले .
गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली.
पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले. छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले.