नोबेल समितीनं येझिदी समाजातली मुलगी आणि आता मानवाधिकारावर काम करणारी कार्यकर्ती, नादिया मुराद हिला नुकताच शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. नादिया मुरादला शांततेचा पुरस्कार जाहीर होणं हा नोबेलचा सन्मान आहे, अशी माझी भावना आहे.
नादिया मुराद येझिदी
१९९३ मध्ये जन्माला आलेली नादिया मुराद येझिदी समाजातली एक मुलगी. इराकच्या उत्तरेकडचा डोंगराळ भाग ‘सिंजार पर्वतमालिका’ नावानं ओळखला जातो. ती सिंजार पर्वतमालिका आणि आसपासचा परिसर गेली अनेक शतकं येझिदी समाजाच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या परिसरातलंच ‘कोच’ नावाचं नादिया मुरादचं एक गाव. येझिदी समाजच अत्यंत गरीब आहे. तेव्हा तिचंही घर गरीब. पण त्या गरिबीतही या कुटुंबातले भाऊ-बहीण प्रेमानं आणि आनंदानं राहत असत.
त्यांच्या घर, गाव आणि संपूर्ण येझिदी समाजावर २०१४ मध्ये आयसिसच्या रूपानं महाभयानक भीषण संकट येऊन कोसळलं. आयसिसचं हे भयानक हिंसक इस्लामिक तत्वज्ञान त्यांना सांगत होतं की सगळ्यांनीच मुसलमान झालं पाहिजे; व्हायला तयार नसाल तर तुमच्यातल्या पुरुषांना आणि वृद्ध स्त्रियांना मारून टाकण्यात येईल आणि मुलामुलींना लैंगिक गुलाम म्हणून वापरलं जाईल. भयानक राक्षसी बेदरकारपणे हे सांगताना ते थेट पवित्र कुराणमधले संदर्भ देत अन्वयार्थ लावत होते की जणू आम्हाला कुराणची नुसती परवानगीच नाही तर त्याचा आम्हाला तसा आदेश आहे. अल्लावर विश्वास ठेऊन पैगंबराला जे शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित मानणार नाहीत त्या पुरुषांना मारून टाका, त्या स्रियांना लैंगिक गुलाम म्हणून (अरेबिक भाषेत याला ‘सबाया’ असा शब्द आहे) वापरा.
नादिया मुरादच्या गावाला कुर्द सैन्याचं संरक्षण होतं. कारण सिंजार पर्वतमालिका ही भौगोलिकदृष्ट्या कुर्दीस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात येते. हे कुर्द लोकही धर्मानं मुस्लिम आणि पंथानं सुन्नी आहेत. पण त्यांची वांशिक ओळख कुर्द अशी आहे; अरब नाही. स्वतंत्र कुर्दिस्तानच्या निर्मितीसाठी त्यांचा इराकमध्येच एक स्वातंत्र्यलढा चालू आहे. येझिदी लोकसुद्धा वांशिकदृष्ट्या कुर्द आहेत. त्यांची मुख्य भाषादेखील कुर्द आहे. कुर्द लोकांनाही त्यांच्याबद्दल जवळीक आहे. येझिदी लोकांना कुर्द प्रशासन आणि कुर्द सैन्याचं संरक्षण पुरवण्यात येतं (कुर्द सैन्याला नाव पेशमेर्गा). पण दुर्दैवाचे दशावतार आले आणि आयसिसची ताकद वाढत गेली. नादिया मुरादचं गाव कोच आणि सभोवतालच्या परिसरातनं पेशमेर्गा लष्करानं माघार घेतली. सगळा येझिदी समाज, त्यातल्या तरुण मुली दुर्दैवानं या राक्षसी लांडग्यांच्या तावडीत सापडल्या. नादिया मुरादच्या गावाची कत्तल झाली. त्यात तिची आई मारली गेली. स्वतः नादिया मुराद, तिच्या बहिणी, तिची वहिनी या सर्वांची लैंगिक गुलाम म्हणून विक्री झाली. त्यांच्यावर सातत्यानं भीषण बलात्कार करण्यात आले. त्यांचे हालहाल करण्यात आले. माणसांचे खरेदीविक्रीचे व्यवहार या पृथ्वीवर एकविसाव्या शतकात घडत होते!
पण त्यामुळं मोडून न पडता नादिया मुराद आणि अशा अनेक येझिदी मुलींनी पळून जाण्याचे प्रयत्न केले. त्यात नादिया मुराद आणि इतर मुली पकडल्या गेल्या. नादिया मुरादला लैंगिक गुलाम म्हणजे सबाया म्हणून ज्यानं खरेदी केलं होतं तो आयसिसमधला वरिष्ठ, प्रभावी ‘राक्षस’ हाजी सलमान. नादिया मुराद पकडली गेल्यानंतर या हाजी सलमाननं आपल्या चार चौकीदारांना तिच्यावर सामूहिक बलात्कार करायला लावला.
खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की इतकं सगळं सोसूनही नादिया मुराद मोडून पडली नाही किंवा शरण गेली नाही. पळून जाण्याचे प्रयत्न तिनं चालू ठेवले आणि एकेवेळी त्यात ती यशस्वी झाली. माणूस म्हणून निदान सांगायला एक दुःखात सुख एवढंच की पळून जाण्यात तिला मदत एका सुन्नी अरब कुटुंबानंच केली.
केवळ एकविसाव्या वर्षी हे सगळं वाट्याला आलेली नादिया मुराद या अत्याचारातन सुटली. आपल्यावर झालेले अन्याय तिनं मोकळेपणानं सांगितले. एरव्ही पुराणमतवादी असलेला येझिदी समाज आणि धर्मगुरू यांनी बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन ज्या मुलींवर अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार झाले त्यांना दोषी न मानता मोकळेपणानं त्यांचा समाजामध्ये स्वीकार केला आणि त्यांच्या सन्मानाची पुनर्स्थापना केली. ती नादिया मुराद आता मानवाधिकार चळवळीतली एक अग्रगण्य कार्यकर्ती आहे. येझिदी समाज, त्यांचा धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी ती काम करते आहे.
येझिदी एक ईश्वर मानतात. तो निर्गुण निराकार आहे. मोराच्या रूपात पाठवलेला प्रेषित हे विश्व चालवतो अशी त्यांची श्रद्धा आहे. मोर ही त्यांची देवता. येझिदी समाजाची मंदिरंही असतात आणि त्यांच्या संतांची स्मृतिस्थळंही आहेत. येझिदी सूर्याची पूजा करतात. रोजची प्रार्थना पूर्वेकडं तोंड करून केली जाते. काही समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हे मूळचे येझिदी भारतातून तिकडं गेले. बाराव्या-तेराव्या शतकापासून येझिदी समाज आणि धर्माची ऐतिहासिक मालिका सापडते.
कुणाच्याही मध्ये न पडणाऱ्या या गरीब समाजावर इस्लामिक धर्मांधतेची कुऱ्हाड कोसळली. त्यात नादिया मुरादच्या रूपानं एक अजिंक्य आत्मा लढायला, प्रतिकार करायला उभा राहिला. नादिया मुराद हे शरण न जाणाऱ्या, मोडून न पडणाऱ्या मानवी वृत्तीचं नाव आहे. ती वृत्ती केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही प्रेरणा आणि बळ देणारी आहे. म्हणूनच नादिया मुरादला मिळालेला नोबेल हा तिचा जेवढा सन्मान आहे त्यापेक्षा जास्त तो स्वतः नोबेल पुरस्काराचा सन्मान आहे.