एक आहे की अनेक आहेत ती संख्या बोध सूचक गुणधर्मास व्याकरणात ‘वचन’ असे म्हणतात.
मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात, काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात.
मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रुपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रुप बदलत नाही.
वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन
१. एकवचन : जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. उदा. मासा, गाय, फूल, मुलगा इ.
२. अनेकवचन : जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. उदा. मासे, गाई, फुले, मुलगे इ.
लिंगभेदाप्रमाणे काही सर्वनामांचे एक-अनेकवचन पुढीलप्रमाणे.
वचन/लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग एकवचन तो ती ते अनेकवचन ते त्या ती
लिंगभेदाप्रमाणे नामांचे एक-अनेकवचन करण्याचे नियम खाली दिले आहेत.
पुल्लिंगी शब्दांचे एकवचन-अनेकवचन
नियम १: आ-कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन रस्ता रस्ते आंबा आंबे ससा ससे लांडगा लांडगे महिना महिने दाणा दाणे अपवाद काका काका आजोबा आजोबा
नियम २ : आ-कारान्त नामांव्यतिरिक्त इतर सर्व पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन उंदीर उंदीर पाय पाय चिकू चिकू देश देश हार हार पक्षी पक्षी केस केस कागद कागद
स्त्रीलिंगी शब्दांचे एक-अनेकवचन
नियम ३ : अ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन करताना कधी आ-कारान्त होते तरे कधी ई-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन खाट खाटा गंमत गमती चूक चुका गाय गाई मान माना तलवार तलवारी कळ कळा मांजर मांजरी धार धारा मोलकरीण मोलकरणी
नियम ४ : ई-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सामान्यतः या-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन कळी कळ्या आई आया बांगडी बांगड्या सुई सुया बी बिया सुरी सुऱ्या स्त्री स्त्रिया वाटी वाट्या अपवाद दासी दासी दृष्टी दृष्टी युवती युवती मूर्ती मूर्ती
नियम ५ : ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्ती होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन जाऊ जावा जळू जळवा ऊ उवा अपवाद वस्तू वस्तू वाळू वाळू वधू वधू बाजू बाजू
नियम ६ : सामान्यतः आ-कारान्त स्त्रीलिंगी नामांची रुपे दोन्ही वचनात सारखीच राहतात.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन कन्या कन्या शिक्षिका शिक्षिका वीणा वीणा मैना मैना घंटा घंटा पूजा पूजा
नपुसकलिंगी शब्दांचे एकवचन-अनेकवचन
नियम ७ : अ-कारान्त/ऊकारान्त नपुंसकलिंगी नामांचे अनेकवचन ए-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन फूल फुले पाखरू पाखरे बदक बदके वासरू वासरे मत मते लेकरू लेकरे
नियम ८ : ए-कारान्त नपुसकलिंगी नामांचे अनेकवचन ई-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन गाणे गाणी खेडे खेडी केळे केळी नाणे नाणी भजे भजी तळे तळी अपवाद सोने सोने रुपे रुपे
‘तो’ या पुल्लिंगी सर्वनामाचे अनेकवचन ‘ते’ असे होत असून, ‘तो आंबा’ याचे अनेकवचन ‘ते आंबे’ असे होते. नपुंसकलिंगात ‘ते’ हे एकवचनी सर्वनाम असल्याने, ‘पुल्लिंगी’ शब्दांचे अनेकवचन ‘नपुंसकलिंगी’ होते तसेच ‘नपुंसकलिंगी’ एकवचनाचे अनेकवचन स्त्रीलिंगी होते असे बऱ्याच जणांचे समज असल्याचे आढळून येते यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.