मुलाखत (Interview) बद्दल मला खूप जणांनी विचारले आणि म्हणूनच हा सक्सेस मंत्र लिहित आहे.
सर्वात आधी ज्यांनी मुख्य परीक्षा क्लियर केली त्यांचे अभिनंदन !!!
मित्रांनो, मुलाखतसाठी कशी तयारी करावी? कोणते प्रश्न येवू शकतात? काय वाचावे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील, बरोबर?
परंतु ज्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष असायला पाहिजे तोच प्रश्न बरेचजण टाळतात आणि तेही मुलाखत अगदी तोंडावर येईपर्यंत ! तो प्रश्न म्हणजे मुलाखतीची तयारी केव्हापासून करायला पाहिजे?
चला तर आधी ह्यावर बोलूया जरा….
मुलाखत काय आहे हे तुम्हाला माहित आहेच. कदाचित काही जणांना माहितही नसेल. ओके. हे बघा, मुलाखत, तुम्ही काय आहात (?) हे जाणून घेण्यासाठी असते. तुम्ही कसे दिसता, कसे वागता हे बाहेरून दिसतेच परंतु तुम्ही आतून कसे आहात हे जाणून घेण्याचा मार्ग म्हणजे मुलाखत.
मित्रांनो, माझ्या मते मुलाखत हा टप्पा तुमच्या निवडीचा एक सर्वात महत्वाचा भाग असतो. त्यासाठी तुम्ही एक किंवा दोन दिवसांत तयारी करू शकत नाही. त्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष लागू शकते.
तुम्ही ज्या दिवशी एमपीएससी किंवा युपीएससीच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करता ना त्याच दिवसापासून तुम्ही मुलाखतीचीसुद्धा तयारी करण्यास सुरुवात करायला पाहिजे. मग ते एक वर्षा आधी असो कि दोन वर्षा आधी असो. का? कारण मुलाखत म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हे. मुलाखत म्हणजे तुमचे आतील व्यक्तिमत्व काय आहे व तुम्ही काय व कशा प्रकारचा विचार करता हे जाणून घेण्यासाठी असते. तुमचे विषयाचे ज्ञान तर लेखी परीक्षेत तपासल्या जातच असते.
त्यासाठी खालील तयारी करायला वेळ लागतो :
- युपीएससी असो कि एमपीएससी असो , इंग्रजीला अनन्य साधारण महत्व आहे. मुलाखत मराठीतही देता येते परंतु काही प्रश्न इंग्रजीतून विचारले तर? इंग्रजीबद्दल मी पुढील सक्सेस मंत्र #10 लिहिणारच आहे; तेव्हा ह्याबाबतीत बोलेन. तो पर्यंत एवढे लक्षात ठेवा कि तुम्हाला मुलाखतमध्ये कमीत कमी स्वत:ला एक्स्प्रेस करता आले पाहिजे. हे करायला वेळ लागतो.
- एखाद्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे हे जाणून घेतात तर तुमचे स्वत:चे मत तुम्ही १ ते २ दिवसात डेव्हलप नाही करू शकत म्हणून तुम्हाला मुलाखतीची तयारी फार फार पूर्वीपासूनच करायला पाहिजे. चालू घडामोडींवर लक्ष देवून त्यावर सखोल माहिती गोळा करून त्याचे मनन करून त्यावर स्वत:चे मत तयार करायला अवधी लागतोच.
- प्रत्येक गोष्टीत तुमचे स्वत:चे मत पोझीटिव्ह्च असायला पाहिजे आणि ते तयार करायला वेळ लागतो.
तर मित्रांनो, घाबरून जावू नका. प्रत्येक गोष्टीसाठी अवधी, मेहनत म्हणजे कष्ट तर पडतातच ना? तुम्ही ब्रेकफास्ट व जेवण करता तर त्यासाठी तुमच्या आवडत्या व्यक्तीला ते तयार करण्यात वेळ आणि कष्ट लागतातच ना!
मुलाखत म्हणजे प्रश्न-उत्तर असेच ना?
You Are Absolutely WRONG!!!.
दिसते तसे नसते! प्रश्न-उत्तर जरी मुलाखतचा एक अभिन्न भाग असला तरी मुलाखतीचा उद्देश वेगळा असतो. त्याला पुढीलप्रमाणे विभागता येईल:
- बाह्य व्यक्तिमत्व (Outer Personality): मुलाखत रुममध्ये (Interview Panelमध्ये) एक सदस्य (सायकोलोजीष्ट) असतो. त्याचे काम म्हणजे मुलाखतीसाठी आलेला उमेदवार कसा दिसतो, कपडे कसे घातलेत, कसा चालतो, कसा बोलतो, कसा वागतो, कसा हसतो ह्यावर बारीक नजर ठेवून असतो. तो सदस्य कोण आहे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही.
- आंतर व्यक्तिमत्व (Internal Personality): उमेदवार काय बोलतो, त्याचे स्वत:चे मत काय आहे, तो कोणत्या वेळी काय रिएक्श्न देतो, गोंधळून जातो कि नाही, अचूक निर्णय घेतो कि नाही, हे सर्व तपासल्या जाते तुमच्या उत्तरातून व तुमच्या Body Language वरून.
मुलाखतीची तयारी केव्हा व कशासाठी हे आपण वर बघितले. आता बघुया कि मुलाखतीची तयारी कशी करावी.
बाह्य व्यक्तिमत्व (Outer Personality): ह्यासाठी पुढीलप्रमाणे तयारी करावी:
- फिटनेस व पर्सनालिटी: तुम्ही दिसायला कसेही असो पण फिटनेस महत्वाची असते. विचार करा कि तुम्ही मुलाखत घेताय आणि तुमच्या समोर दोन उमेदवार आहेत. एक उमेदवार आकर्षक आहे पण ओव्हरवेट असून त्याचे पोट सुटलेले आहे. दुसरा उमेदवार दिसायला मात्र तितका आकर्षक नाही परंतु त्याचे पोट सुटलेले नाही व सडपातळ आहे. ह्या दोघांपैकी तुम्ही कोणाला सिलेक्ट कराल? समजलेना मला काय म्हणायचे आहे? ह्यासाठी तुम्ही तुमची फिटनेस चांगली ठेवा. आठवड्यातून कमीतकमी ३ ते ४ दिवस व्यायाम करा आणि रनिंग करा. तुम्ही कसे दिसता हे आरशात निरखून पहा. त्यात काय इम्प्रूव्हमेंट करता येईल ते बघा. हेअर-स्टाईल कशी चांगली दिसते हे बघा. हेअरकट चेंज करा, गरज पडल्यास. मित्रांना विचारा. त्यांनी काही कणखर मत मांडले तर तुम्हाला वाईट वाटू देवू नका. ते तुमच्या चांगल्यासाठीच सांगतील हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा फायदा तुम्हाला पुढेही होईलच. Just Imagine! कि तुम्ही ट्रेनिंग करत आहात आणि तिथे तुम्ही साधे धावू पण शकला नाहीत आणि नेहमी नेहमी मागे राहिलात तर तेव्हा कसे वाटेल!! फिटनेस यायला वेळ लागतोच हे लक्षात ठेवा.
- चालणे : चालतांना तुमचा पाय आडवा-तिडवा पडत नाही ह्याची काळजी घ्या. एका सरळ रेषेत चालावे म्हणजे तुमच्या शूज (स्त्री असाल तर चप्पल/सेंडल) चे पुढील टोक एका रेषेत पडायला पाहिजे. असे चालण्याची सवय पाडावी. ह्यासाठीही खूप वेळ लागतो त्यामुळे हा सराव खूप आधीपासूनच करावा.
- बोलणे: तुम्ही कसे बोलता हे तुमच्या किंवा मित्राच्या/मैत्रिणीच्या मोबाईल मध्ये रेकोर्ड करा आणि मग ते पहा. न अडखळता बोलावे. बोलतांना हातवारे करू नये व डोकेसुद्धा जास्त हलवू नये. तसे करत असाल तर ते न करण्याची सवय पाडा. बोलत असताना तुमचे हात जराही इकडे-तिकडे फिरवू नये. करत असाल तर हे ठीक करावे. ह्याला सुद्धा वेळ लागतो.
- कपडे : मुलाखत ही तुमच्या जीवनातील एक अति-महत्वाची घटना आहे. त्यासाठी तुम्ही अगदी एक चांगला ड्रेस तयार ठेवावा. जरुरी नाही कि नवीनच असावा. हे सर्व मुलाखतीच्या एक आठवडा अगोदर करावे. टाय लावायची सवय पाडा. आठवड्यातून एक दिवस तरी टाय लावून फिरा. हे करणे शहरातील मुलांना नॉर्मल आहे परंतु खेडेगावातील मुलांसाठी हे नवीनच आहे आणि ते लाजतीलही (Come On डियर, ह्यात लाजण्यासारखे काही नाही). लक्षात ठेवावे कि मुलाखत ही तुमच्या जीवनातील एक अति-महत्वाची घटना आहे. Interview Panel हे बघतेच की ह्या दिवसाचे महत्व तुम्हाला समजते कि नाही आणि ह्या दिवसासाठी तुम्ही काय विशेष तयारी केली आहे. मित्रांनो, ह्याला टाळू नका. हे फार महत्वाचे आहे. खिशात फक्त एक रुमाल असावा. मागील खिशात वालेट (पर्स) ठेवाल तर त्यात जास्त काही ठेवू नका. तुमचे pocket फुगलेले दिसू नये. खिशात गाडीची चावी असेल तर त्यासोबत वाजणारी दुसरी वस्तू असू नये म्हणजे चालतांना आवाज होणार नाही.
आंतर व्यक्तिमत्व (Internal Personality): ह्यासाठी पुढीलप्रमाणे तयारी करावी:
- आत्म-विश्वास: आंतर व्यक्तिमत्वाची सर्वात महत्वाची पहिली पायरी म्हणजे आत्म-विश्वास. जो पर्यंत आत्म-विश्वास तुमच्यात नाही तो पर्यंत, तुम्हाला जे हवे, ते बोलू शकत नाही. कोणतीही गोष्ट बोलायची म्हणजे बोलण्यात वजन आणावे लागते. वजन येत नाही, आणावे लागते. आणि ते कसे येईल? स्वत:वर विश्वास ठेवा. पुढे पाहूया…. समजेलच आपोआप.
- ज्ञान: कोणत्याही विषयावर बोलायचे असल्यास त्यासाठी लागणारे ज्ञान असावे लागते. कोणताही मुद्दा पूर्णपणे, समर्थपणे मांडायचा असल्यास त्याबद्दल सर्व माहिती असायला पाहिजे. एक मुद्द्याच्या दोन्ही बाजू माहित असावयास हव्या (एक- पोझीटिव्ह, दोन – निगेटिव्ह). कोणत्याही प्रश्नावर दोन्ही बाजूंनी बोलता यावे असे ज्ञान जरुरी असते.
- सकारात्मक दृष्टीकोन: आता हे काय? एकदम साध्या भाषेत सांगायचे म्हणजे बोलण्यात सकारात्मकता असावी. एक उदाहरण देतो: तुमच्या समोर एक काचेचा ग्लास आहे आणि त्यात ५०% पाणी आहे.
वरील ग्लास पाहून तुमच्या ओठांवर पुढीलपैकी कोणते वाक्य येईल?
१) ग्लास अर्धा भरलेला आहे.
२) ग्लास अर्धा रिकामा आहे.
जर पहिलं वाक्य आले असेल तर तुमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे आणि दुसरे वाक्य असेल तर मग नकारात्मक दृष्टीकोन आहे.
आता हा दुष्टीकोन कोणताही असो ह्याचा फायदा काय?
मित्रांनो, कोणतीही माहिती बोलायची असेल तर ती सकारात्मक पद्धतीने बोलावे म्हणजे तुम्ही पुढाकार घेणार आणि हातात असलेले कार्य तुम्ही पूर्ण करालच असा निष्कर्ष निघतो परंतु नकारात्मक पद्धतीने बोललात तर ते कार्य तुम्ही अर्धवट सोडाल असा निष्कर्ष मुलाखतीत निघू शकतो.
सकारात्मक दृष्टीकोन फक्त आणि फक्त सरावानेच येवू शकतो.
तुम्ही जे बोलाल त्यावरून तुमचे व्यक्तिमत्व दिसून येईल.
आता पुढील महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणते प्रश्न येवू शकतात?
- मुख्य परीक्षेचा फॉर्म भरला होता ना तर त्यातील मुख्य माहितीवर तुम्ही प्रश्न अपेक्षित करू शकता
- तुमचं नाव जर एखाद्या फेमस व्यक्तीशी मिळतं जुळत असेल तर त्यावर प्रश्न विचारल्या जावू शकते
- मागील ३ ते ४ महिन्यात घडलेल्या घडामोडी
- हॉबीज
- उप-जिल्हाधिकारी (किंवा ज्या पदासाठी इच्छुक आहात ते) व्हायचं का ठरवलं?
- भाऊ, बहिण, आई वडील काय करतात?
- कामाचा अनुभव असेल तर त्यावर प्रश्न?
काय वाचावे?
-
खालील मासिके वगेरे वाचून काढा:
- इंडिया इयर बुक 2014
- मनोरमा इयर बुक 2014
- लोकराज्य (मागील काही महिन्यांच्या कॉपीज)
- योजना
- कुरुक्षेत्र
- eMPSCkida
- Indian Express
- Internet
ज्या दिवशी तुमची मुलाखत असेल त्या दिवशीचे मुख्य न्यूजपेपर्स वाचायला विसरू नका हं !लवकरच मी विडीयो द्वारे मुलाखत मार्गदर्शन सुरु करणार आहे म्हणजे तुम्हाला ह्यासाठी कुठेही जायची गरज पडणार नाही. ज्याला हे मार्गदर्शन हवे त्यांनी स्वत:चा विडीयो काढून मला पाठवावा किंवा ह्या ब्लोगवर अपलोड करावा आणि तो पाहून मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. ह्याबद्दल पुढील आठवड्यात सांगेल.
ज्यांनी मुख्य परीक्षा क्लियर केली आहे आणि मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांना बेस्ट विशेस आणि ज्यांनी आतापासून ह्या परीक्षेची तयारी सुरु केली आहे त्यांनासुद्धा Good Luck !!!