स्पर्धा परीक्षां करणाऱ्यासांठी परिक्षांचे नियोजन करणे खुप गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात पॉलिटी हा घटक अतिशय महत्त्वाचा मनाला जातो. याची कारणमीमांसा अनेक प्रकारे करता येईल. पहिले कारण म्हणजे, प्रशासक म्हणून कार्यरत झाल्यावर ज्या संवैधानिक चौकटीमध्ये काम करायचे आहे, त्या व्यवस्थेची तोंडओळख ‘पॉलिटी’च्या अभ्यासामधून होते. दुसरे कारण म्हणजे, राज्यव्यवस्थेच्या (पॉलिटी) अभ्यासामुळे चालू घडामोडींचे विश्लेषण करणे सोपे पडते. तिसरे कारण म्हणजे, हा विषय सामान्य अध्ययन पेपर क्र. २ (मुख्य परीक्षा), निबंधाचा पेपर तसेच मुलाखतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. तात्पर्य, ‘इंडियन पॉलिटी’ या घटकाचा सखोल अभ्यास व चिंतन यूपीएससीसाठी (व अन्य स्पर्धा परीक्षांसाठीही) अपरिहार्य ठरते.
या अभ्यासघटकाचे महात्म्य जाणून घेतल्यावर पुढील काम म्हणजे त्याचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेणे. स्पर्धा परीक्षेला बसणारे सर्वच उमेदवार काही कला शाखेचे विद्यार्थी नसतात. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना ‘राज्यशास्त्र’ या विषयामुळे ‘पॉलिटी’ची तोंडओळख होते. मात्र अन्य शाखांचे विद्यार्थी महाविद्यालयीन वर्षांमध्ये या विषयाबाबत अनभिज्ञ असतात. महाविद्यालयातील ‘फाउंडेशन कोर्स’ या विषयाच्या अभ्यासक्रमातून पॉलिटीची थोडीशी झलक विद्यार्थांना मिळू शकते. मात्र सर्वच विद्यार्थ्यांची या विषयाची पहिली व जुजबी ओळख शालेय अभ्यासक्रमातून नागरिकशास्त्र या विषयाद्वारे होते. सध्या शालेय शिक्षण घेत असलेल्या पिढीला ही ओळख ‘राज्यशास्त्र’ विषयातून होत आहे. आता वाचकांच्या लक्षात येईल की, हा विषय आपल्याला थोडाअधिक तरी माहीत असतो. मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्याविषयी अधिक खोलात जाण्याची गरज असते.
मग या विषयाची नेमकी सुरुवात कशी करायची, हे जाणून घेऊया. भारताला प्राचीन संस्कृती व इतिहास लाभला आहे. आपल्याकडे अनेक राजघराणी विविध प्रदेशांमध्ये होऊन गेली. या प्रत्येकाने स्वतःची राज्यपद्धती व प्रशासकीय चौकट विकसित केली होती. मात्र ‘पॉलिटी’च्या अभ्यासासाठी एवढे मागे जाण्याची गरज नाही. ब्रिटीश भारतात स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी केलेले विविध कायदे व नवीन रचना हा आपल्या ‘पॉलिटी’च्या अभ्यासाचा आरंभबिंदू समजायचा. सुरुवातीला इस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या सनदांचा (चार्टर अॅक्ट्स) अभ्यास करायचा. त्यानंतर, म्हणजे १८५७च्या उठावानंतर ब्रिटीश संसदेने भारतासाठी बनवलेल्या कायद्यातील प्रमुख तरतुदींचा अभ्यास करायला हवा. कारण या सर्व कायद्यांमधून भारतातील ब्रिटीशकालीन राजकीय व्यवस्था आकारात होती. स्वातंत्र्य चळवळीने जोर धरल्यानंतर सरकारमध्ये भारतीयांचे प्रतिनिधित्व कसे वाढत गेले, निवडणुकांची सुरुवात कधी व कशी झाली, केंद्र- राज्य अशी विभागणी कशी झाली, संसदेला दोन सदने कधीपासून प्राप्त झाली, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणे रंजक वाटते. ब्रिटिशांनी भारतात निर्माण केलेल्या विविध व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही कायम राहिल्या. अर्थात, त्यात आवश्यक बदल केले गेले. मात्र ढोबळमानाने ब्रिटीश संसदीय लोकशाहीचा ढाचा भारताने स्वातंत्र्योत्तर काळात स्वीकारला.
ब्रिटीश कायद्यांच्या अभ्यासानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे, भारताच्या राज्यघटनेचा (संविधानाचा) अभ्यास. ब्रिटिशांनी देश सोडण्यापूर्वी त्यांच्याच कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री) योजनेनुसार भारताच्या संविधानसभेची म्हणजेच घटना समितीची स्थापना केली. त्यासाठी निवडणुका झाल्या. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले विविध प्रांतांतील व पक्षांतील नेते घटना समितीवर निवडून आले. जवळपास तीन वर्षे घटनानिर्मितीचे कार्य सुरू होते. ही घटना म्हणजे आपल्या घटनाकारांच्या स्वतंत्र भारताविषयी असलेल्या आकांक्षांचे प्रतिबिंब होते. भारत एक सार्वभौम लोकशाही गणराज्य बनावे, यादृष्टीने अनेक तरतुदी घटनेत केल्या गेल्या. यासाठी ब्रिटीशांनी केलेल्या कायद्यांचा तसेच अन्य देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास घटनाकारांनी केला. या घटनेद्वारे आपल्या देशाचा कारभार चालतो. घटना हा सर्वोच्च कायदा आहे. त्यामुळे भारतीय राज्यव्यवस्था समजून घेताना घटनेतील विविध तरतुदींचा अभ्यास गरजेचा ठरतो.
अर्थात, आपली राज्यघटना खूप प्रदीर्घ आहे. त्यातील प्रत्येक शब्द वाचायचा व समजून लक्षात ठेवायचा, हे कठीण आहे. स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना अन्य घटकांचाही अभ्यास करायचा असल्याने हे अशक्यप्राय आहे. म्हणूनच काही मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या. यासाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके हा उत्तम पर्याय आहे. यानंतर राज्यघटनेतील महत्त्वाचे विभाग व कलमे तसेच घटनादुरुस्त्यांचा अभ्यास चांगल्या संदर्भ ग्रंथातून करायचा, अशी स्ट्रॅटेजी असावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मूलभूत ज्ञानाची सांगड वर्तमानातील घडामोडींशी घालण्याची सवय लावून घ्यावी. यासाठी वर्तमानपत्रांतील विश्लेषणात्मक लेख, चांगल्या मासिकांतील विशेष लेख यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. विशेषतः मुख्य परीक्षेसाठी याचा उपयोग होतो.