स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी कोणते वैशिष्ट्ये निवडावे लागलेत यांची थ्याेडक्यात माहिती दिलेलह आहे ते आपण पाहू या. भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक, परिश्रमपूर्वक घेतल्याचे आपल्याला दिसते. भारतीय राज्यघटेनवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व व्यवहाराचा प्रभाव पडल्याचे दिसते आणि स्वातंत्र्यलढय़ातून आकारास आलेल्या भारतीय परिस्थितीचे अपत्यदेखील मानले जाते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेला विशेष स्वरूप प्राप्त झालेले आहे. तिची काही ठळक वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत-लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना मोठी आहे. सुरुवातीला राज्यघटनेत २२ प्रकरणे, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत २४ प्रकरणे, ४४८ कलमे आणि १२ परिशिष्टे आहेत.
ताठरता व लवचीकता यांचा समन्वय
भारताची राज्यघटना अंशत: ताठर आणि अंशत: लवचीक आहे. घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही सर्वसामान्य बाबीसाठी पुरेशी लवचीक आणि महत्त्वाच्या बाबीसाठी पुरेशी ताठर आहे. त्याचा योग्य मेळ भारतीय राज्यघटनेत घालण्यात आला आहे.
लोककल्याणकारी राज्य
भारतीय राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वागीण विकास साध्य करून कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा होय. धर्म, जात, वंश, प्रदेश असा कोणताही भेदभाव लोककल्याणाच्या बाबतीत न करता प्रत्येक व्यक्तीचा राजकीय, सामाजिक, आíथक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साध्य करण्याची जबाबदारी शासनाची आहे.
मूलभूत हक्क
भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण तीनमध्ये मूलभूत हक्कांचा विस्ताराने समावेश केलेला आहे. राज्य घटनेतील १२ ते ३५ ही कलमे नागरिकांचे मूलभूत हक्क स्पष्ट करतात. मूलभूत हक्कांचे स्वरूप न्यायिक झाले आहे.
संसदीय शासनपद्धती
भारताने इंग्लंडपासून संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केलेला आहे. देशाच्या राज्यकारभारात संसद ही केंद्रस्थानी आहे. संसद ही शासनपद्धतीची दिशा निश्चित करते. भारतात पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळासह लोकसभेला जबाबदार आहे.राष्ट्रपतींच्या नावे सर्व कारभार चालत असला तरी राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागावे लागते. या पद्धतीत पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख असतात.संघराज्य शासनपद्धती भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यांसाठी स्वतंत्र सरकार आहे. राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात केंद्र व घटकराज्य यांच्यातील अधिकार विभागणी केली आहे. त्यांच्यातील वाद निष्पक्षपणे सोडविता यावेत, म्हणून स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण केली आहे. केंद्र व राज्य सरकारमधील सत्तासंबंध पाहिल्यावर आपणाला केंद्र सरकार घटक राज्यापेक्षा प्रबळ झालेले दिसते, म्हणून काही विचारवंतांच्या मते, भारताला पूर्ण संघराज्य न म्हणता आभासात्मक संघराज्य म्हणतात.
प्रौढ मताधिकार
भारतीय घटनेने भारतीय नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्वाना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिलेला आहे. सुरुवातीला २१ वष्रे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा अधिकार प्राप्त झाला होता. परंतु १९८९ साली झालेल्या ६१व्या घटनादुरुस्तीने १८ वष्रे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांना सरसकट मतदानाचा अधिकार दिलेला आहे.
स्वतंत्र्य न्यायव्यवस्था
भारताच्या राज्यघटनेने स्वतंत्र न्यायमंडळाचा पुरस्कार केला आहे. न्यायमंडळावर दडपण येऊ नये, म्हणून न्यायाधीशाचे निवृत्ती वय, त्याचा कार्यकाळ घटनेने निश्चित केला आहे. विविध प्रकारचे वाद मिटविण्यासाठी कोणत्याही दबावापासून मुक्त असणारी न्यायव्यवस्था निर्माण केली आहे.सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेनेच राज्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. राज्यातील अंतिम सत्ता भारतीय लोकांच्या हाती आहे आणि भारतीय
राज्यव्यवस्था परकीय नियंत्रणापासून मुक्त असल्याचे उद्देशपत्रिकेतून स्पष्ट होते. तेथेच समाजवादी व धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख दिसून येतो. देशातील सर्वोच्च अधिकार लोकांच्या हाती असल्याने भारत हा प्रजासत्ताक आहे आणि देशाचे प्रमुख राष्ट्रपती असून ते विशिष्ट काळासाठी निवडलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे भारत हा देश गणराज्य आहे, असे म्हणता येते.एकेरी नागरिकत्व भारत हे संघराज्य असूनही भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेचे हे एक वेगळे वैशिष्टय़ मानले जाते.
अल्पसंख्याकांना संरक्षण
मागासलेल्या जाती, जमाती व अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी राज्यघटनेत काही तरतुदी आहेत. त्यांच्या विकासाची जबाबदारी राज्याची आहे. केंद्र व राज्य कायदेमंडळात अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव जागा ठेवल्या आहेत. त्याचबरोबर अल्पसंख्याकांना आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्कराज्यघटनेने दिलेला आहे आणि अशा हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनव्यवस्थेवर टाकलेली आहे.