प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्या अर्थाने पाया रोवला गेला. र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे भारतीय राज्यकर्त्यामध्ये त्याविषयी जे आकर्षण निर्माण झाले त्यातुन अनेक राजे, महाराजे व नबाब यांनी या पध्दतीचा स्वीकार केला.
वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमित्ताने पोर्तृगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली. त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले. ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत आणि धोरणात विविध कायद्यांद्वारे बदल कसे होत गेले. याचा उहापोह या प्रकरणात केला आहे.
युरोपियनांचे भारतात आगमन :
पूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्यांचा मार्गच अडवून धरला. आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताकडे जाणार्या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो १४९२ मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशास भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढण्यास यश मिळाले. वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला. या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्यावरील पहिले पाऊल होते.
१६१५ मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इ. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्रचंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता. काही मालाच्या बाबतीत या व्यापार्यांना १०० टक्के फायदा मिळत होता. पुढे १७१७ साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.
युरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा :
ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता. पण भारतातही होणार्या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्यांशी स्पर्धा करावी लागली. त्या वेळी भारतात कार्यरत असणार्या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली. त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय. भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही. याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला. सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला. दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता. या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते. इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसला.