मराठी व्याकरण वाक्प्रचार

अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.
अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

अवलंबून असणे :- शिष्य नेहमी गुरूच्या ज्ञानावर अवलंबून असतो.

अवगत होणे :- एक महिने अभ्यासाने कॉम्प्युटर कसा चालवावा, याची कला राजेशला अवगत झाली.

अंगवळणी पडणे :- सुरुवातीला सायकल चालवताना मोहन घाबरला होता; पण हळूहळू सायकल चालवणे त्याच्या अंगवळणी पडले.

अंगी बाळगणे :- माणसाने दुसऱ्याकडचे चांगले गुण नेहमी अंगी बाळगावेत.

अंगीकार करणे :- महात्प्रयासाने स्वातीने सासरच्या चालीरीतींचा अंगीकार केला.

अंग चोरणे :- आपले अंग चोरून महादूने मालकांना वाट करून दिली.

अंत होणे :- पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचा अंत झाला.

अंतर ण देणे :- शेठजींनी दामू या आपल्या नोकराला कधीही अंतर दिले नाही.

अंदाज बांधणे :- मोहनच्या पडलेल्या चेहऱ्यावरून तो नाराज झाला आहे, असा आईने अंदाज बांधला.

आकलन होणे : काकांनी समजावून सांगितले की, बऱ्याचशा कठीण गोष्टींचे मला आकलन होते.

आदर बाळगणे : लहान मुलांनी नेहमी थोरामोठ्यांचा आदर बाळगावा.

आनंदाचे भरते येणे : पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे नीताला आनंदाचे भरते आले.

आरोळ्या ठोकणे :- क्रिकेटमध्ये जिंकल्यावर मुलांनी आनंदाने आरोळ्या भोकल्या.

आव्हान देणे :- गुप्त कारस्थान करणाऱ्या शत्रूला भारतीय सेनेने आव्हान दिले.

आयात करणे : जावा-सुमात्रा बेटावरून भारत मसाल्यांच्या पदार्थांची आयात करतो.

आवाहन करणे : ‘पूरग्रस्तांना मदत करा’ असे चाळ कमिटीने प्रत्येक भाडेकरूला आवाहन केले.

आळशांचा राजा :- रमेश काहीच काम करत नाही, दिवसभर लोळत असतो. तो म्हणजे आळशांचा राजा आहे.

आश्चर्य वाटणे :- या दिवाळीत गावामध्ये खुप फटाके फुटल्याने मला आश्चर्य वाटले.

आश्चर्याने तोंडात बोटे घालणे :- अपंगांची शर्यत पाहून रोहण आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

आश्चर्यचकित होणे :- सर्कशीतील नाचणारा हत्ती बघून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.

आज्ञा पाळणे :- आईवडिलांची व गुरुजनांची आज्ञा पाळावी.

औक्षण करणे : दिवाळीला अभ्यंगस्नान केल्यावर आईने मला औक्षण केले.

इलाज नसणे : अतिरेक्यांनी भारताचे एवढे नुकसान केले की त्यांच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय सरकारकडे इलाज नव्हता.

उत्कट प्रेम असणे :- माझे माझ्या शाळेवर उत्कट प्रेम आहे.

उत्कंठेने वाट पाहणे :- वाऱ्याच वर्षांनी माहेरी येणाऱ्या नलूची राधाबाई उत्कंठेने वाट पाहत होत्या.

उगम पावणे :- त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात गोदावरी नदी उगम पावते.

उचलली जीभ लावली टाळ्याला :- राजेश प्रत्येक गोष्टीत आपल्याला ज्ञान आहे अशीच वागते. म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळ्याला.

उत्तीर्ण होणे :- प्रमोद एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.

उदरनिर्वाह करणे :- कमालीचे कष्ट उपसून दामू आपला उदरनिर्वाह करत होता.

उन्हे उतरणे :- उन्हे उतरताना आई शेतातून घरी आली.

ऋण फेडणे :- गरिबांची सेवा करून प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडले पाहिजे.

एकजीव होणे :- गावातील रस्ता तयार करताना गावकऱ्यांनी एकजीव होऊन काम केले.

एकटा पडणे :- वर्गात वीरुशी कोणी बोलत नसल्यामुळे तो एकटा पडला.

एक होणे :- सर्व भारतीयांनी एक होऊन दहशतवादाचा बीमोड केला पाहिजे.

ऐट दाखवणे :- नवीन कपडे घालून छोटा राजू सर्वांना ऐट दाखवत होता.

कदर करणे :- बादशहाने बिरबलाच्या चातुर्याची नेहमी कदर केली.

करुणा उत्पन्न होणे : रामूचे दारिद्र्य पाहून सर्वांच्या मनात करुणा उत्पन्न झाली.

कमाल करणे :- नाटकात सुंदर अभिनय करून विनिताने अगदी कमाल केली.

कच खाणे :- माथेरानला दरीत उतरताना चंदूच्या मनाने कच खाल्ली.

कचरणे :- रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करायला पर्यटकांचे मन कचरले.

कपाळमोक्ष होणे :- गच्चीवरून कोसळल्यामुळे गच्चीत काम करणाऱ्या कामगाराचा कपाळमोक्ष झाला.

कलाटणी मिळणे : मधुकर नौदलात भरती झाला आणि त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली.

कष्टाचे खाणे :- शेतकरी शेतात राब राब राबतो व कष्टाचे खातो.

कळी खुलणे :- आजीने आणलेली सुंदर सुंदर खेळणी पाहून लहानग्या शीतलची कळी खुलली.

कंबर कसणे :- भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी क्रांतीकारकांनी कंबर कसली.

काबाडकष्ट करणे :- मामीने आपल्या मुलाला काबाडकष्ट करून शिकवले.

काटकसर करणे :- तुटपुंज्या पगारात महिन्याचा खर्च करताना रेखाकाकू काटकसर करत होत्या.

कातड्याचे जोडे घालणे :- सुरज नोकर सावकारांना म्हणाला, “माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही पैसे दिलेत, तर मी तुम्हांला माझ्या कातड्याचे जोडे घालीन.”

काबीज करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी कुमारवयातच तोरणा गड काबीज केला.

कागाळी करणे :- सुचिताने पुस्तक फाडले, अशी नीताने आईकडे कागाळी केली.

कानात वारे शिरणे :- बऱ्याच दिवसांनी मोकळ्या मैदानात आणल्यावर कुत्र्याच्या पिलाच्या कानात वारे शिरले.

कामगिरी करणे :- बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवून शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी बजावली.

कालबाह्य ठरणे :- दूरदर्शनच्या वाढत्या प्रसारामुळे हल्ली रेडिओ कालबाह्य ठरू लागला आहे.

काहूर उठणे : पृथ्वीवर धूमकेतू आदळणार, या अफवेचे लोकांमध्ये काहूर उठले.

कामाचे चीज होणे :- मिडलस्कूल परीक्षेत राहुल प्रथम आल्यामुळे त्याने रात्रंदिवस केलेल्या कामाचे चीज झाले.

काया झिजवणे :- मदर तेरेसांनी अनाथ बालकांसाठी आयुष्यभर आपली काया झिजवली.

काळजी घेणे :- छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेत होते.

काळजात चर्र होणे :- कोसळलेल्या इमारतीची बातमी वाचून सुनंदाच्या काळजात चर्र झाले.

काळजाला हात घालणे :- मेधा पाटकर यांनी धरणग्रस्तांची बाजू कळकळीने मांडून लोकांच्या काळजाला हात घातला.

कृतघ्न असणे :- स्वतः कष्ट करून राधाबाईने रामला शिकवले, पण त्यांच्या म्हातारपणी दूर जाऊन तो कृतघ्न ठरला.

कैद करणे :- शाळेतील मुलांनी अभ्यास होण्या साठी स्वताला कैद करून घतले.

किंमत करणे :- पोशाखावरून नाही; पण एखाद्या माणसाच्या बोलण्यावरून त्याची किंमत करावी.

कुवत असणे :- न थकता दहा किलोमीटर धावण्याची राजेशची कुवत होती.

कुशल चिंतणे :- देवाला नवस करून कुमारकाकींनी आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी कुशल चिंतीले.

कुरकुर करणे :- सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून राजू दिवसभर कुरकुर करत होता.

कुरवाळणे :- संध्याकाळी परतलेल्या गाईला वासुदेव मायेने कुरवाळतो.

कूस धन्य करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापून जीजामातेची कूस धन्य केली.

कोरडे ठणठणीत पडणे :- आमच्या गावचा ओढा भर उन्हाळ्यात कोरडा ठणठणीत पडतो.

कौतुक वाटणे :- मुग्धा एवढ्या लहान वयात उत्तम गाते याचे सर्वांना कौतुक वाटते.

खजील होणे :- चोरी उघडकीस आल्यावर रामू खजील झाला.

ख्याती असणे :- उत्तम धावपटू म्हणून पी.टी. उषा यांची ख्याती आहे.

खटके उडणे :- मीरा व रमा या जुळ्या बहिणींचे एकाच वस्तूवरून नेहमी खटके उडतात.

खळीला येणे :- दहा फेऱ्यांनंतरही निकाल लागला नाही; तेव्हा दोन्ही पहिलवान खळीला आले.

खंडाने जमीन घेणे :- शामुकाकांनी इनामदारांची पडिक जमीन खंडाने घेतली.

खडान्खडा माहिती :- आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या कामकाजाची खडान्खडा माहिती आहे.

खांद्याला खांदा लावून काम करणे :- शाळेचे बांधकाम करताना गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.

खेटून उभे राहणे :- लहानगा शरद आपल्या आईला अगदी खेटून उभा होता.

खेद प्रदर्शित करणे :- लोकलगाड्या वेळेवर धावत नसल्यामुळे स्टेशन मास्तरांनी प्रवाशांकडे खेद प्रदर्शित केला.

खेळ रंगात येणे :- शाळेला सुट्टी असते, तेव्हा लहान मुलांचा खेळ रंगात येतो.

खोड मोडणे :- हात सोडून सायकल चालवणारा राजू जेव्हा एकदा सपाटून आपटला, तेव्हा त्याची खोड मोडली.

गप्पांना भरती येणे :- खूप दिवसांनी काकु घरी आल्यामुळे त्यांच्या व आईच्या गप्पांना भरती आली.

गयावया करणे :- चोर स्वताला सोडण्या साठी पोलिसांकडे गयावया करत होता.

गलबलणे :- रेल्वे दुर्घटनेतील जखमी प्रवासी पाहून माणसे गलबलली.

गर्दी पांगवणे :- पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली.

गट्ट करणे :- येज्ञेशने डब्यातील ठेवलेले दहा लाडू एका दमात गडप झाला.

गस्त घालणे :- चोरीमारी होऊ नये; म्हणून स्टेशनवर पोलीस गस्त घालत होते.

गडप होणे :- वाघाला पाहून रानातला हरिणांचा कळप लगेच गडप झाला.

गर्भगळीत होणे :- दोन पावलांवर अचानक आलेल्या सापाला बघून बबन गर्भगळीत झाला.

गरज भागणे :- शाळेतील वाचनालयामुळे शरदची अभ्यासाची गरज भागली.

गहजब उडणे :- गावात वाघ मोकाट सुटला हे ऐकून रात्री गावात एकच गहजब उडाला.

गहिवरणे :- वीस वर्षांनंतर आपल्या मुलाला पोटाशी धरताना पार्वतीकाकू गहिवरल्या.

गळा घोटणे :- दागिन्यांच्या हव्यासापायी चोराने रात्री आमच्या शेजारच्या काकूंचा गळा घोटला.

गाडी अडणे :- एका इंग्रजी शब्दाच्या अर्थापाशी मधुराची गाडी अडली.

गांगरून जाणे :- जत्रेतील तुफान गर्दी बघून छोटा बबन गांगरून गेला.

गाढ झोपणे :- आईच्या मांडीवर बाळ गाढ झोपला होता.

गाव गोळा होणे : गरुडीचा खेळ पाहण्यासाठी गाव गोळा झाला.

गाडून घेणे :- शर्यतीच्या स्पर्धेसाठी दिलीपने स्वतःला सरावात गाडून घेतले.

गोंगाट करणे :- शाळेला सुट्टी असल्यामुळे दुपारच्या वेळी मुले मैदानात गोंगाट करत होतो.

गौरव करणे :- शालान्त परीक्षेत जिल्ह्यात पहिली आल्यामुळे मुख्याध्यापकांनी अमृताचा गौरव केला.

घाम गाळणे :- शेतकरी दिवसभर शेतात घाम गाळतात.

घायाळ होणे :- झाडावरून खाली पडल्यामुळे चिमणीचे पिल्लू घायाळ झाले.

घोकत बसणे :- शेजारचा मधू संस्कृत शब्द घोकत बसला होता.

घोकंपट्टी :- उद्या भाषेचा पेपर म्हणून अमित आजपासूनच घोकंपट्टी करत होता.

चक्कर मारणे :- मी गावी गेलो की, संध्याकाळी नदीकाठी चक्कर मारतो.

चरणांवर मस्तक ठेवणे :- वारीला गेलेले वारकरी श्रीविठ्ठलमूर्तीच्या चरणांवर मस्तक ठेवतात.

चाचपडत राहणे :- वीजकपातीमुळे अंधारात म्हातारे भाऊकाका चाव्यांचा जुडगा हुडकण्यासाठी चाचपडत राहिले होते.

चांगले दिवस येणे :- मुलगा कामाला लागला आणि दरेकर कुटुंबाला चांगले दिवस आले.

चिडीचूप होणे :- सर वर्गात येताच गडबड करणारी मुले चिडीचूप झाली.

चेव चढणे :- शत्रूचे सैन्य दिसताच भारतीय जवानांना चेव चढला.

छाया शोधणे :- भर उन्हात चालता चालता चालता महेश दमला व छाया शोधू लागला.

जग कळणे : वयाच्या दहाव्या वर्षीच महादूला

जाहीर करणे :- उद्या पाणी येणार नाही, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

जिवाचे सोने होणे :- दोन्ही मुले चांगली शिकल्यामुळे काशीबाईंच्या जिवाचे सोने झाले.

जीवदान देणे :- महाराजांनी रायरीच्या पाटलांना जीवदान दिले.

जीवावर येणे :- वीस माणसांचा स्वयंपाक करणे, हे राधाबाईच्या अगदी जीवावर आले.

जीव मेटाकुटीला येणे :- रात्रभर काम करून सीताकाकूंचा जीव मेटाकुटीला आला.

जीव सुखावणे :- मुलगा स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आला, हे ऐकून स्वातीबाईंचा जीव सुखावला.

झडप घेणे :- घारीने कोंबडीच्या पिलांबर वरून झडप घेतली.

डोक्यावरचे ओझे उतरणे :- पुरामध्ये रामरावाचे घर वाहून गेले नाही, असे कळताच त्यांच्या भावाच्या डोक्यावरचे ओझे उतरले.

डोळा चुकवणे :- लहानगा राजू आईचा डोळा चुकवून खेळायला गेला.

डोळे भरून येणे :- परदेशात चाललेल्या विनयला पाहून आईचे डोळे भरून आले.

डोळे ओले होणे :- चित्रपटातील करुण प्रसंग पाहताना प्रेक्षकांचे डोळे ओले झाले.

डोळे पाण्याने डबडबणे :- सासरी निघालेल्या मुलीला निरोप देताना राधाकाकुंचे डोळे पाण्याने डबडबले.

डोळ्यांत पाणी येणे :- ताईला सासरी धाडताना आईच्या डोळ्यांत पाणी आले.

डोळ्यांतून टिपे गळणे :- दहा वर्षांनी आईने संजयला पाहिले आणि तिच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली.

डोळ्यांवर येणे :- क्रांतिकारकांनी केलेले गुप्त कट ब्रिटिश पोलिसांच्या डोळ्यांवर आले.

डोळे दिपणे :- इंद्रधनुष्य पाहून नीताचे डोळे दिपले.

डोळे पुसणे :- मदर तेरेसांनी कित्येक दुःखितांचे डोळे पुसले.

तणतणणे :- मधुराला आईने सहलीला जाऊ दिले नाही; म्हणून ती आईवर तणतणली.

तडे पडणे :- पाऊस न पडल्यामुळे आमच्या गावातील शेतजमिनीला तडे पडले.

तहानभूक हरपणे :- खेळायला मिळाले, की राजेशची तहानभूक हरपते.

तर्क करणे :- बंडू पुण्याला गेलाय म्हणजे नक्कीच आत्याकडे गेला असणार, असा अमरने तर्क केला.

तडाखा बसणे :- गेल्या वर्षी गावाला महापुराचा तडाखा बसला.

ताजेतवाने होणे :- सकाळच्या हवेत फिरून आल्यावर मी ताजातवाना झालो.

ताण येणे :- उद्या होणाऱ्या मिडलस्कूल स्कॉलरशिप परीक्षेचा मीनाच्या मनावर ताण आला.

तावडीतून सुटणे :- हिसका मारून चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला.

ताप सरणे :- पहिला पाऊस पडताच जमिनीचा ताप सरला.

ताब्यात देणे :- कट्टर अतिरेक्याला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

तांबडे फुटणे :- तांबडे फुटले की शेतकरी शेतामध्ये कामाला जातात.

तोंडचे पाणी पळणे :- रानामध्ये दोन पावलांवर अचानक मोठा साप बघून सहलीला गेलेल्या मुलांच्या तोंडचे पाणी पळाले.

तोंडघशी पडणे :- कोलांट्या उद्या मारता मारता मधू तोंडघशी पडला.

तोंडातून चकार शब्द न काढणे :- सर राजेशवर रागावले, तेव्हा त्याने तोंडातून चकार शब्द काढला नाही.

तुच्छ वाटणे :- अभ्यासापुढे संजयला खेळणे तुच्छ वाटते.

तुडुंब भरणे :- पावसामध्ये आमच्या गावची विहीर तुडुंब भरते.

त्रेधा-तिरपीट उडणे :- संध्याकाळी येणारे पाहुणे सकाळीच आल्यामुळे मंदाची त्रेधा-तिरपीट उडाली.

त्याग करणे :- गांधीजींच्या आदेशानुसार सर्व अनुयायांची विदेशी कपड्यांचा त्याग केला.

थक्क करणे :- एकापाठोपाठ एक असे शंभर सूर्यनमस्कार करून रामूने सर्वांनाच थक्क केले.

थट्टा करणे : सर्व दोस्तांमध्ये राजू बुटका असल्यामुळे सगळे त्याची थट्टा करत.

थाप मारणे :- सिनेमा बघायला गेलेल्या सुधीरने ‘मी मित्राकडे अभ्यास करत होतो,’ अशी आईला थाप मारली.

थारा देणे :- अकबर बादशहाने सर्व कलावंतांना दरबारात थारा दिला.

दगा न देणे :- चांगल्या मित्राला कधीही दगा देऊ नये.

दर्शन घेणे :- आग्र्याला जाऊन आम्ही ताजमहालाचे दर्शन घेतले.

दाद मागणे :- आपल्यावर झालेल्या अन्यायाची रामरावांनी कोर्टात दाद मागितली.

दिवस रेटणे :- पतीचे निधन झाल्यावर काशीबाईनी कसे तरी दिवस रेटले.

दिलासा देणे :- बॉम्बस्फोटामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना प्रंतप्रधानांनी दिलासा दिला.

दुजोरा देणे :- हिवाळ्यात सहल काढायची, या गुरुजींच्या म्हणण्याला वर्गातील सर्व मुलांनी दुजोरा दिला.

देखरेख करणे :- रात्री आमचा वॉचमन सोसायटीची देखरेख करतो.

देवाणघेवाण करणे :- धर्मपरिषदेमध्ये प्रतिनिधींनी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली.

देह झिजवणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपला देह झिजवला.

देहभान हरपणे : पावसात भिजताना मुले देहभान विसरतात.

धड न समजणे : शाळेत आलेले परदेशी पाहुणे काय बोलत होते ते आम्ही मुलांना धड समजत नव्हते.

धडा शिकवणे :- पोलिसांनी चोरांना गजाआड करून चांगलाच धडा शिकवला.

धन्य होणे :- देवाचे दर्शन होताच संत नामदेव धन्य झाले.

धडे देणे : रामभाऊंनी मुलाला मोठ्या माणसांशी कसे नम्रतेने वागावे, याचे धडे दिले.

धपाटे घालणे :- उजळणी आली नाही की माझे मामा पाठीत धपाटे घालायचे.

ध्यास घेणे : लहान वयातच राहुलने बुद्धिबळपटू होण्याचा ध्यास घेतला.

धारण करणे :- लहानपणच्या नरेंद्राने मोठेपणी स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले.

धाडस दाखवणे :- मनोहरने एकट्याने विहिरीत उडी मारण्याचे धाडस दाखवले.

धाप लागणे :- धावण्याच्या शर्यतीत जोरात धावल्यामुळे रोहितला धाप लागली.

धूम धावत सुटणे :- शाळा सुटताच मुले धूम धावत सुटली.

नक्कल करणे :- स्नेहसंमेलनात उदयने सरांची अगदी हुबेहूक नक्कल केली.

नजर ठेवणे :- अतिरेक्यांच्या कारवायांवर पोलिसांनी नजर ठेवली होती.

नवल वाटणे :- अबोल असलेला संजय उमेशची तक्रार करताना भडाभडा बोलताना पाहून त्याच्या आत्याला नवल वाटले.

नजर चुकवणे : आईची नजर चुकवून राजू खेळायला गेला.

नमूद करणे : पुण्याला सोळा सेंटिमीटर पाऊस पडला, असे वेधशाळेने उमूद केले.

नाव गाजने : सचिन तेंडुलकरमुळे साऱ्या जगात भारताचे नाव गाजले.

नाशवंत असणे :- या जगात कोणतीही गोष्ट अमर नाही, ती नाशवंत आहे.

निरीक्षण करणे : मी काढलेल्या चित्राचे बाईंनी निरीक्षण केले.

निष्ठा असणे : मोहितची आपल्या गुरुजींच्या बुद्धिमत्तेवर खूप निष्ठा होती.

निपचित पडून राहणे :- दोन दिवस आलेल्या तापामुळे लहानगे बाळ निपचित पडून होते.

पदवी देणे : वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांना ‘सर’ ही पदवी देण्यात आली.

पर्वा नसणे : क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्रासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही.

पश्चात्ताप होणे : ज्या खंडूने वर्गात पहिला नंबर काढला, त्या खंडूला आपण खेडवळ म्हणून हसलो होतो याचा सलीलला पश्च्यात्ताप झाला.

पंखात वारं भरणे :- शालान्त परीक्षेनंतर आय.टी. क्षेत्रात चमकायचे, या विचाराने संदीपच्या पंखात वारं भरलं.

पाया पडणे : संध्याकाळी हातपाय धुऊन देवाच्या पाया पडावे.

पाय ओढणे :- सगळ्यांनी एकदम प्रगती करावी, कोणीही कुणाचे पाय ओढू नयेत.

पायाशी बसणे :-गावी गेलो की, माझे बाबा नेहमी आजोबांच्या पायाशी बसत.

पार पडणे :- गेल्या आठवड्यात आमच्या शाळेचे स्नेहसंमेलन पार पडले.

पाळेमुळे खोल रुजणे :- गाव सोडताना आईला दु:ख झाले; कारण या गावाच्या संस्कृतीत तिची पाळेमुळे खोल रुजली होती.

पोट भरणे : महादू दिवसरात्र कष्ट करून आपले पोट भरतो.

पोटाला चिमटा घेणे : पोटाला चिमटा घेऊन काकूंनी राजला उच्च शिक्षण दिले.

पोशिंदा असणे : साऱ्या मराठमोळ्या रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज पोशिंदा होते.

प्रत्युत्तर देणे : बाबांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला श्याम प्रत्युत्तर देत होता.

प्रसंग बेतणे : पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचा प्रसंग बेतला.

प्रविष्ट होणे :- सत्यनारायणाची महापूजा घातली आणि नंतरच सर्वजण नवीन घरात प्रविष्ट झाले.

प्राणाचे बलिदान करणे :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकाराकांनी प्राणाचे बलिदान केले.
पाय धरणे : हातून घडलेल्या चुकीबद्दल बबनने राकाशेटचे पाय धरले.

प्रेमाचा भुकेला असणे :- अनाथाश्रमातील मुले प्रेमाची भुकेली असतात.

पिंगा घालणे :- मंगळागौरी खेळताना माहेरी आलेल्या सुमनने सुंदर पिंगा घातला.

फावला वेळ मिळणे : फावला वेळ मिळाला की, माझी आई वाचन करते.

फेरफार करणे :- मी लिहिलेल्या निबंधामध्ये गुरुजींनी फार चांगले फेरफार केले.

फिर्याद करणे : जमिनीच्या संबंधात दामूकाकांनी शेजाऱ्यावर फिर्याद केली.

बहुमान मिळणे : आंतरशालेय स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसे पटकावणाऱ्या उमाला स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला.

बडगा दाखवणे :- चोरांनी गुन्हा कबूल करावा म्हणून पोलिसांनी त्यांना कडक शिक्षेचा बडगा दाखवला.

बळकटी येणे :- संदर्भग्रंथांचे वाचन करून वक्त्याच्या विचारांना बळकटी येते.

बाजूस सारणे :- ओजस्वीने टेबलावरचे दप्तर बाजूला सारले.

बारा महिने तेरा काळ :- वामनरावांची देवपूजा अगदी बारा महिने तेरा काळ सुरूच आसरे.

बाजार भरणे :- सुट्टीमध्ये मामाच्या घरी आम्हा पोरांचा बाजार भरला होता.

बालेकिल्ला असणे :- अकोला शहर हे तर उमेदवार विष्णुपंतांचा बालेकिल्ला होता.

बावचळणे :- समोरून अचानक आलेला हत्ती पाहून अनुश्री एकदम बावचळली.

बुचकळ्यात पडणे :- आईला अचानक रडताना पाहून मोहन बुचकळ्यात पडला.

बेभान होणे :- मोठ्या भावाच्या वरातीमध्ये रघू बेभान होऊन नाचला.

भाळी असणे :- दिवसभर काबाडकष्ट करणे हेच आमच्या आजीच्या भाळी होते.

भांबावून जाणे :- आईचे बोट सुटल्यामुळे जत्रेमध्ये गर्दीत छोटा राहुल भांबावून गेला.

भीतीने थरथरणे : विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वर काढले, पण तो भीतीने थरथरत होता.

भुकेने तडफडणे : तीन दिवस उपाशी असल्यामुळे भिकारी भुकेने तडफडत होता.

भुलून जाणे : ते सुंदर निसर्गचित्र पाहून सरिता भुलून गेली.

भूल पडणे : राजेशनने काढलेली सुंदर चित्रे बघून सोहनच्या मनाला भूल पडली.

भेदरणे :- विहिरीत पडलेले मूल खूप भेदरले होते.

मन रमणे : कुमारचे पोहण्यात मन रमते.

मन उचंबळणे :- गोव्याचा मोठा समुद्रकिनारा पाहून स्मिताचे मन उचंबळले.

मनाई असणे : भर पावसात बोटींना खोल समुद्रात जाण्यास मनाई असते.

मशागत करणे : चांगले पीक येण्यासाठी शेतकरी आपल्या शेतांची मशागत करतात.

मस्तक आदराने लवणे : स्वांतत्र्यवीरांच्या कहाण्या ऐकताना आपले मस्तक आदराने लवते.

माघार घेणे : भारतीय सैन्याने चाल केल्यामुळे शत्रूच्या सैनिकांनी माघार घेतली.

मान डोलवणे : सहलीला यायचे का, असे राजूला विचारताच त्याने मान डोलवली.

मातीजमा होणे :- पिकांवर रोग पडल्यामुळे शेतातील पिके एकेक करून मातीजमा झाली.

मान खाली घालणे :- पोलिसांनी धमकावताच चोराने मान खाली घातली.

मान देणे :- आमच्या सरांना गावातील लोक खूप मान देतात.

मान हलवणे :- ‘सहलीला जायचे ना’ असे गुरुजींनी विचारताच सर्वांनी मान हलवली.

मुक्त करणे : गुन्हा शाबित न झाल्यामुळे न्यायालयाने चोराला मुक्त केले.

मुलूख थोडा करणे :- गावात दुष्काळ पडल्यामुळे गावकऱ्यांनी मुलूख थोडा केला.

मृत्यू पावणे : जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधी मृत्यू पावतो.

मोह होणे : देवासमोरचे लाडू चोरण्याचा स्वप्नीलला मोह झाला.

मौन पाळणे : शैलाने विवेकानंद जयंतीला दिवसभर मौन पाळले होते.

याचना करणे :- दोन घासांसाठी रस्त्यावरचा भिकारी येत्या-जात्या माणसाकडे हात पसरून याचना करत होता.

येरझारा घालणे :- रात्री अकरा वाजून गेले तरी मधू घरी परतला नाही, म्हणून बाबा अंगणातच येरझारा घालत होते.

रक्त उसळणे :- शत्रूवर हल्ला करण्यासाठी सैनिकांचे रक्त उसळले.

रद्द करणे :- अतिवृष्टीमुळे गुरुजींनी वर्षासहल रद्द केली.

रद्द होणे :- निवडणुकीमुळे एक मार्चला होणारी शालान्त परीक्षा रद्द झाली.

रमून जाणे : सुरेश खेळात नेहमी रमून जातो.

रवंथ करणे :- दुपारी झाडाच्या सावलीत गाईगुरे रवंथ करत बसतात.

रंगात येणे :- मधूकाका व अण्णा यांचा पत्त्यांचा डाव रंगात आला होता.

-हास होणे :- शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे पूर्वीच्या समाजाचा खूप -हास झाला.

राग येणे :- चंदूने पुस्तक फाडले म्हणून राजीवला त्याचा राग आला.

राजी असणे :- रडणाऱ्या महेशला सर्कसला जाऊया, म्हणताच तो पटकन राजी झाला.

राब राब राबणे :- महादू हमालीचे काम करताना रात्रंदिवस राब राब राबतो.

रूढ होणे :- ‘स्टेशन’ हा इंग्रजी शब्द मराठीत अगदी रूढ झाला आहे.

रुसून बसणे :- आईने खाऊ दिला नाही म्हणून संजय रुसून बसला.

लगबग असणे :- शेजारच्या काकूंच्या घरात मुलीच्या लग्नाची लगबग होती.

लाभ होणे :- शिवरामकाकांना लॉटरी लागून अचानक पैशांचा लाभ झाला.

लुप्त होणे :- आकाशात दाटून आलेल्या ढगांमध्ये चंद्र लुप्त झाला.

लौकिक मिळवणे : स्वातीने उत्कृष्ट टेनिस खेळून जगात लौकिक मिळवला.

वचन देणे :- मी कधीही नापास होणार नाही, असे अमितने आईला वचन दिले.

वर्गवारी करणे :- निबंध-स्पर्धेसाठी सरांनी वयोगटाप्रमाणे मुलांची वर्गवारी केली.

वाटेकडे कान लावून बसणे :- आई खाऊ घेऊन येईल, या आशेने दोन लहान मुले उंबरठ्यातच आईच्या वाटेकडे कान लावून बसली होती.

वाईट वाटणे :- सुरेश नापास झाल्यामुळे रमेशला वाईट वाटले.

वाळीत टाकणे :- पंचायतीने दिलेला निर्णय पाळला नाही, म्हणून गावाने सोसवार कुटुंबाला वाळीत टाकले.

विचार कृतीत उतरवणे :- महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढून आपले विचार कृतीत उतरवले.

विचारपूस करणे : सुट्टीत आम्ही कोकणात आत्याकडे गेलो तेव्हा तिने आमची विचारपूस केली.

विचारविनिमय करणे :- परेशला कोणत्या महाविद्यालयात घालायचे, याबद्दल त्याच्या आईवडिलांनी विचारविनिमय केला.

विचारात बुडून जाणे :- प्रमोदच्या समोर येऊन उभा राहिलो तरी त्याचे माझ्याकडे लक्ष गेले नाही, एवढा तो विचारात बुडून गेला होता.

विसर पडणे :- पाश्चिमात्य पद्धतींचा अंगीकार करताना जुन्या चांगल्या प्रथांचा आम्हांला विसर पडला आहे.

विळखा घालणे :- अफझलखानाच्या सैन्याने प्रतापगडला विळखा घातला.

विश्रांती घेणे : दुपारच्या वेळी माझे बाबा विश्रांती घेतात.

वेष पालटून फिरणे : पूर्वीचे राजे लोकांचे सुखदुःख जाणून घेंण्यासाठी आपल्या राज्यातून वेष पालटून फिरायचे.

वेळ वाया जाणे : वेळ हे धन आहे; ते वाया जाऊ देऊ नये.

वैषम्य वाटणे :- आंधळ्या म्हातारीला आपण रस्ता पार करायला मदत केली नाही, याचे सदूला वैषम्य वाटले.

व्याख्यान देणे : बाबा महाराज सातारकरांनी शाळेच्या पटांगणात ‘ज्ञानेश्वरी’ वर व्याख्याने दिली.

शब्द देणे : मी कधीच नापास होणार नाही, असा आशिषने आईला शब्द दिला.

शब्द फिरवणे : महात्मा गांधीना दिलेला शब्द कस्तुरबांनी एकदा फिरवला.

शब्द मोडणे : पुन्हा शाळेत उशिरा येणार नाही, असे सांगूनही आज मोहनने गुरुजींना दिलेला शब्द मोडला.

शब्दाला कृतीचे तारण असणे : निबंध-स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुमनने शब्दाला कृतीचे तारण दिले.

शड्डू ठोकणे :- रिंगणात उतरताच रघू पहिलवानाने प्रतिस्पर्ध्यासमोर शड्डू ठोकला.

शरमिंदा होणे :- रामुकाकांकडे पुन्हा पैसे उसने मागताना दामू शरमिंदा झाला.

शान वाढवणे :- १९८३ साली क्रिकेटचा विश्वचषक जिंकून कपिलदेवने भारताची शान वाढवली.

शिफारस करणे : रवीतात्याने आपल्या दोस्ताकडे उमेश चांगले काम करतो, अशी शिफारस केली.

शिकवण देणे :- ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे,’ अशी महात्मा गांधींनी आपल्याला शिकवण दिली.

शिगेला पोहोचणे :- ‘असंभव’ मालिकेत शास्त्र्यांच्या वाड्याचे काय होणार, याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली.

शिंग फुंकणे :- जुलमी इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी शिंग फुंकले.

शीण घालवणे :- कामावरून थकून आलेल्या दामोदरपंतांनी फक्कड चहा पिऊन शीण घालवला.

शीण येणे :- दिवसभर टेबलावर लिखाणाचे काम करून दामूकाकांना शीण आला.

शोषण करणे :- बरेचसे गिरणीमालक कामगारांचे शोषण करत असत.

सक्रिय सहभाग घेणे :- रक्तदान शिबिरामध्ये गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सढळ हाताने मदत करणे :- आईने दारी आलेल्या साधूला सढळ हाताने मदत केली.

सन्मान करणे :- राज्यात निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापकांनी रेश्माचा सन्मान केला.

सर्रास वापरणे :- सुधाकर आपल्या वाडीलभावाचे बूट सर्रास वापरतो.

सल्ला देणे :- बाबांनी मला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला.

सहकार्य करणे :- एकमेकांना सहकार्य करून गावकऱ्यांनी गावातील रस्ता बांधला.

सवलत देणे :- गरीब विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी फीमध्ये सवलत दिली.

संकल्प सोडणे :- उद्यापासून पहाटे उठून अभ्यास करण्याचा शीलाने संकल्प सोडला.

संथा चुकणे :- सर्कस पाहायला गेल्यामुळे रामूची रोजची संथा चुकली.

संपादन करणे :- डॉ. आंबेडकरांनी परदेशात जाऊन ‘बॅरिस्टर’ ही पदवी संपादन केली.

साथ देणे : वर्ग स्वच्छ करताना मीनाला सविताने साथ दिली.

सार्थ ठरणे : लता मंगेशकर यांच्याबाबतीत ‘गानकोकिळा’ ही पदवी सार्थ ठरली.

सामना करणे :- कोकणातील लोक दारिद्र्याशी सामना करतात.

साय खाणे :- बालपण कष्टात गेलेल्या मधूचे आता चांगले दिवस आल्यामुळे तो साय खातो.

सुतासारखा सरळ करणे : चोराला कडक शिक्षा करून पोलिसांनी त्याला सुतासारखा सरळ केला.

सुधारणा होणे : शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली.

सुविधा असणे : ए.टी.एम. बँकेच्या ग्राहकांनी कधीही पैसे काढण्याची सुविधा आहे.

सुगावा लागणे :- अतिरेकी काहीतरी घातपात करणार आहेत, याचा पोलिसांना सुगावा लागला.

सूर धरणे : कीर्तनाच्या आधी भजनीबुवा गात असताना आम्हीही सूर धरला.

सूर मारणे :- कडक उन्हामध्ये नदीकाठावरची मुले नदीमध्ये सूर मारत होती.

सेवा करणे : हेमाने आपल्या आजारी आईची मनोभावे सेवा केली.

सेवा पुरवणे : काही संस्था घरपोच भाजी पाठवण्याची सेवा पुरवतात.

स्वप्न साकार करणे : चंद्रावर जाण्याचे माणसाचे स्वप्न साकार झाले.

सुधारणा होणे : शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली आहे.

स्वागत करणे : विवेकानंद जयंतीला आमच्या शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मुख्याध्यापकांनी स्वागत केले.

स्तब्ध राहणे :- तळटळीत दुपारी झाडाची सर्व पाने स्तब्ध राहिली होती.

स्मारक बांधणे :- गावासाठी आयुष्यभर झिजणाऱ्या सुधाकरराव घोरपड्यांचे गावकऱ्यांनी मरणोत्तर स्मारक बांधले.

स्वाहा करणे :- दामूने समोर ठेवलेल्या परातभर जिलब्या स्वाहा केल्या.

हजेरी घेणे : ऑफिसमधून घरी परतल्यावर बाबांनी अभ्यासाबाबत माझी हजेरी घेतली.

हवेहवेसे वाटणे : खूप वर्षांनी गावाहून आलेल्या आजीचा सहवास तुषारला हवाहवासा वाटत होता.

हद्दपार करणे :- महात्मा फुले यांनी जुन्या जाचक रूढींना हद्दपार केले.

हयगय करणे :- पहाटे पहाटे उठून व्यायाम करण्यासाठी सुधीर हयगय करू लागला.

हयात सरणे :- इनामदारांच्या वाड्यावर चाकरी करता करता दामूकाकांची हयात सरली.

हमी देणे :- या औषधाने उंदीर नक्की मरतील, अशी औषधविक्रेत्याने रामरावांना हमी दिली.

हारीने बसणे :- पाऊस पडून गेल्यावर आपले पंख सुकवण्यासाठी कावळे तारेवर हारीने बसले होते.

हिंमत देणे :- आजारातून उठलेल्या नितीनला परीक्षेला बसण्यासाठी सरांनी हिंमत दिली.

हुकूम करणे :- न्यायाधीशांनी गुन्हेगारांना कोर्टात हजर करण्याचा पोलिसांना हुकूम केला.

हुकूमत येणे :-बरीच मेहनत केल्यामुळे मनोजला सफाईदारपणे इंग्रजी बोलण्यावर हुकूमत आली.

हुडहुडी भरणे : ऐन हिवाळ्यात महाबळेश्वरला हेमंतला हुडहुडी भरली.

हेका धरणे :- सुमितने (बाबांकडे) सुट्टीमध्ये गावाला जाण्याचा हेका धरला.

हेटाळणी करणे :- प्रमिलाकाकू आपल्या सावत्र मुलीची सारखी हेटाळणी करतात.

क्षमा मागणे :- ‘पुन्हा गडबड करणार नाही,’ असे म्हणून माधवने सरांची क्षमा मागितली. empsckida%2Blogo2