-
पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रारूपात झालेला बदल.
-
यूपीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम आणि प्रश्नांचा अॅप्रोच
-
यूपीएससीच्या परीक्षार्थीनी एमपीएससीच्या परीक्षा देण्याचे वाढलेले प्रमाण.
स्पध्रेत राहायचे असेल तर उमेदवारांना तयारीचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. पारंपरिक अभ्यासाचे ठोकळे, गाइड, रट्टा मारून यश मिळवता येणार नाही. विषयाच्या मूलभूत वाचनापासून नियोजनबद्ध नेमकी तयारी करावी लागेल. तयारीचे प्राधान्यक्रम काय आणि कसे असावेत, याविषयी पाहू.
अभ्यासक्रम :
पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम प्रत्येक घटकासाठी एक ते दीड ओळीत दिलेला आहे. सामान्य अध्ययन पेपर एक आणि पेपर दोनसाठी एकूण १५ ओळींचा अभ्यासक्रम व या १५ ओळींवर ४०० गुणांसाठी १८० प्रश्न विचारले जातील. प्रश्नांच्या वस्तुनिष्ठ स्वरूपामुळे प्रश्नांची संख्या वाढली. काठिण्य पातळी जपण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बहुविधानी करण्यात आले आहेत. बहुविधानी स्वरूपामुळे एका प्रश्नातून एका मुद्दय़ाच्या वेगवेगळ्या बाजू विचारल्या जातात. म्हणून सर्वप्रथम अभ्यासक्रमाचाच व्यवस्थित अभ्यास करून तुमच्या अभ्यासाची व्याप्ती ठरवा. त्यातील प्रत्येक शब्दाबाबत तुमच्या खिशात कमीत कमी पाच/सहा ऑब्जेक्टिव्ह, सुस्पष्ट संकल्पना तयार असायला हव्यात. त्यावर कसाही प्रश्न आला तरी त्याला सामोरे जाण्याची तुमची तयारी हवी. निष्कर्ष काढायला सांगणारे प्रश्न आले तर उपलब्ध माहितीच्या आधारे उत्तरे देता आली पाहिजेत. यासाठी बेसिक्स नीट समजून घेतले असतील तरच असे प्रश्न आत्मविश्वासाने सोडवता येतात.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका :
आयोगाला काय अपेक्षित आहे व आपल्या अभ्यासाची नेमकी कोणती दिशा असणे आवश्यक आहे हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा आणि अधिकृत मार्ग म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. कोणत्याही प्रकरणाची तयारी सुरू करण्यापूर्वी, आपल्याला त्या प्रकरणाशी निगडित पूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची माहितीही असायलाच हवी. त्यातून आपल्या ते विशिष्ट प्रकरण आणि त्याच्या उपविभागांच्या तयारीत नेमकेपणा आणता येतो. कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, काठिण्य पातळी किती आहे, संकल्पनात्मकदृष्टय़ा कोणते पलू महत्त्वाचे, वस्तुनिष्ठदृष्टय़ा कोणते पलू महत्त्वाचे ते समजून येते.
एक प्रकरणाची तयारी पूर्ण झाली की, पुन्हा आधीच्या वर्षांतील प्रश्नपत्रिकांवर नजर फिरवा. त्यातील प्रश्नांची उत्तरे समाधानकारकपणे देता येतात का ते तपासून पहा. अशी स्वयंचाचणी ही आत्मविश्वासाची पातळी उंचावण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रश्नांची काठिण्य पातळीही दरवर्षी बदलत असते. त्याचे अनेक पलू आहेत. आधीच्या वर्षांत आलेले अनेक प्रश्न हे चालू घडामोडींशी संलग्न नसल्याचे भासेल.
संदर्भ साहित्य :
राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीचा नुसता अभ्यासक्रमच कॉपी-पेस्ट केलेला नाही तर काही सवयीसुद्धा अंगीकारल्या आहेत. प्रश्नांचा अॅप्रोच पूर्णपणे बदलला आहे. अशा प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी वस्तुनिष्ठ माहितीची घोकंपट्टी आणि ठरावीक लोकप्रिय ठोकळे-गाइड वाचून स्पध्रेत टिकणे अवघड आहे. बेसिक पुस्तकांचे वाचन अत्यावश्यक ठरले आहे. संदर्भ पुस्तक निवडण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. आपण निवडत असलेले पुस्तक अभ्यासक्रमानुरूप आहे का, हे तपासा. संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट होत असेल आणि आयोगाच्या प्रश्नपद्धतीस अनुरूप विषयाची मांडणी केली असेल तरच हे संदर्भ साहित्य अभ्यासासाठी उपयुक्त समजावे. बेसिक पुस्तकांसह इंडिया इयर बुक, योजना, लोकराज्य यांना पर्याय नाही. के सागर व पीयरसन प्रकाशनाच्या महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. अभ्यासाच्या सुरुवातीला कोणत्या पुस्तकाची किती पाने वाचावीत, विशिष्ट प्रकरणासाठी
सर्वोत्तम साहित्य कोणते याचे नियोजन तुमच्याकडे तयार नसणे, एकंदर तयारीची ही सर्वात मोठी उणीव आहेच, त्याचबरोबर बहुतेकांच्या अपयशाचे हे महत्त्वाचे कारण असते. योग्य संदर्भ साहित्याची निवड ही अत्यंत महत्त्वाची असते हे लक्षात घ्या.
वाचन-अध्ययन :
संदर्भ साहित्यातून नेमके साहित्य, नेमके मुद्दे वेचणे-वाचणे-वाचलेले समजणे-समजलेले स्मरणात साठवणे व योग्य वेळी ते आठवणे अशा अभ्यास प्रक्रियेतील वाचन – आकलन व अध्ययन हे टप्पे आहेत. वस्तुनिष्ठ तथ्ये विचारणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी झाली असून संकल्पनात्मक, विश्लेषणात्मक प्रश्नांची संख्या वाढली आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपात अचूकतेला जास्त महत्त्व असते. विषय घटक वाचताना महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे व वारंवार उजळणीचे तंत्र वापरावे लागते. तथ्यात्मक प्रश्नांसाठी हे ठीक आहे, पण संकल्पनात्मक, बहुविधानी प्रश्नांसाठी मूलभूत अभ्यास महत्त्वाचा असतो. पायाभूत संकल्पना सुस्पष्ट असणे फार महत्त्वाचे असते. यासाठी एका विषयावर वेगवेगळे माहितीचे स्रोत हाताळावे लागतात. एका विषयासाठी वेगवेगळी दोन-तीन पुस्तके अभ्यासावी लागतील. इतकी मेहनत आता आवश्यक आहे.
आत्मपरीक्षण :
अभ्यास करायची क्षमता उमेदवारांनुरूप वेगवेगळी असते, पण आपला अभ्यास ‘किती पाण्यात’ आहे हे कळण्यासाठीचा मार्ग असतो, परीक्षेपूर्वीची परीक्षा म्हणजे स्वत:ची परीक्षा. वाचन पूर्ण झाल्यावर, अभ्यासक्रमाच्या एक अथवा दोन प्रकरणांवर तुम्ही स्वत:च स्वत:ची छोटी चाचणी घेऊन पाहावी. तुमचे प्लस पॉइंट आणि विक पॉइंट तुम्हाला शोधून काढता आले पाहिजेत. प्रश्नपत्रिका सोडविण्याची स्वत:ची अशी पद्धत तुम्ही विकसित केली पाहिजे. तुम्ही तुमच्या वेळेचे व्यवस्थापन कसे करता? उपलब्ध वेळेत नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे देणे तुम्हाला शक्य होते? त्या दोन तासांत तुमचे लक्ष विचलित झाल्याने किती वेळ वाया जातो? या साऱ्या प्रश्नांची तुमच्याकडे ठोस उत्तरे असायला हवीत. त्या उत्तरानुरूप आणि काठिण्य पातळीनुरूप प्रश्नपत्रिका सोडविण्याचे किमान दोन डावपेच तुमच्याकडे असायला हवेत. योग्य समयी तुमची कामगिरी उंचावली पाहिजे आणि ती योग्य वेळ म्हणजे परीक्षेचा दिवस असायला हवा.