व्याकरण : हा विभाग पकीच्या पकी गुण मिळवून देणारा आहे. त्यामुळे व्याकरणावर पकड मजबूत असायला हवी. नियम समजून घेणे व सराव करणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
लेखन :कार्यालयीन/औपचारिक पत्रांसाठीची ‘रचना’ पक्की लक्षात असायला हवी. या पत्रांची भाषा औपचारिक असणे व मुद्देसूदपणे म्हणणे मांडणे आवश्यक आहे.
अनौपचारिक पत्रांमध्ये भाषा थोडीशी मित्रत्वाची किंवा कमी औपचारिक असावी. नात्यांप्रमाणे योग्य ते अभिवादन व मायना कटाक्षाने वापरावा.
मुलाखत अथवा पत्रकार परिषदेमध्ये संवादाचा ओघ राहील अशा प्रकारे लेखन करणे आवश्यक आहे. दोन व्यक्तींमधील संवाद हा दोघांचे वेगवेगळे दृष्टिकोन गृहीत धरून रंगवलेल्या चच्रेच्या स्वरूपात असावा. ही चर्चा एका निष्कर्षांपर्यंत यावी. शब्दमर्यादेचे पालन व्हायलाच हवे.
निबंध हा सर्वात जास्त गुण असलेला प्रश्न आहे. वैचारिक, समस्याधारित निबंधात विषयाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आíथक व इतर काही संबंधित पलू विचारात घ्यावेत. सरळ या मुद्यांचा तक्ता करून त्यात सुचणारे मुद्दे भरावेत. यानंतर योग्य व समर्पक मुद्दे (साधारणपणे १० ते १२) निवडून त्यांचा क्रम ठरवून घ्यावा. परिणामकारक सुरुवात करण्यासाठी सुविचार, कविता आदींचा वापर करता येईल. ठरलेल्या क्रमाने थोडक्यात मुद्दे मांडावेत व निष्कर्षांने शेवट करावा.
कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेच्या अतिशयोक्त भराऱ्या असू नयेत. ‘कल्पना’सुद्धा तर्कशुद्ध असणे महत्त्वाचे.
निबंध लेखनास थेट सुरुवात करू नये. कच्च्या पानावर आधी १० मिनिटे सुचतील ते मुद्दे मांडत राहावे. त्यानंतर पुढची पाच मिनिटे त्यांचा क्रम, सुरुवात व शेवट ठरवण्यासाठी वापरावीत आणि पुढच्या १५-२० मिनिटांत प्रत्यक्ष लेखन करावे.
आकलन : या बाबतीतले प्रश्न चार प्रकारे विचारले जातात- भाषांतर, सारांश लेखन, आशय लेखन आणि उताऱ्यावरील प्रश्न.
सारांश लेखन :उताऱ्याचा सारांश हा उताऱ्याच्या एक तृतीयांश इतक्या शब्दमर्यादेत व स्वत:च्या शब्दांत लिहायला हवा.
उत्तरपत्रिकेत या प्रश्नासाठी तक्ता स्वरूपात वेगळे पान दिलेले असते व प्रत्येक चौकोनात एकच शब्द लिहायचा असतो. त्यामुळे तक्तयाच्या किती ओळींमध्ये तुमचा सारांश पूर्ण होईल, हे लक्षात येते.
उत्तरपत्रिकेत या प्रश्नासाठी तक्ता स्वरूपात वेगळे पान दिलेले असते व प्रत्येक चौकोनात एकच शब्द लिहायचा असतो. त्यामुळे तक्तयाच्या किती ओळींमध्ये तुमचा सारांश पूर्ण होईल, हे लक्षात येते.
संपूर्ण उतारा वाचत बसण्यापेक्षा सरळ पहिला परिच्छेद वाचून त्याचा सारांश लिहायचा, मग पुढच्या परिच्छेदचा सारांश असे करत गेल्यास वेळेची बचत होते.
स्वत:चे मतप्रदर्शन टाळावे.
उताऱ्यातील उद्गार, उदाहरणे वगळावी.
संज्ञा, संकल्पनांचे स्पष्टीकरण देऊ नये.
विचारले असेल तरच लहानसे आणि समर्पक शीर्षक द्यावे.
भाषांतर –
इंग्रजी व मराठी यांचा वाक्यरचनेमध्ये मूलभूत फरक आहे. हे व्यवस्थित समजून घ्यायला हवे. विशेषत: इंग्रजीतून मराठी भाषांतर करताना वाक्यरचना कृत्रिम होण्याची शक्यता असते. तेव्हा आधी वाक्य व्यवस्थित वाचून त्याचा भावार्थ समजून घ्यावा आणि मग त्याचे मराठी वाक्य लिहावे.
आधी मनातल्या मनातच वाक्याचा भावार्थ ज्या भाषेत उत्तर लिहायचे आहे त्या भाषेत उच्चारला की हे सोपे होऊन जाते.
काही वेळेस एखाद्या शब्दाला प्रतिशब्द सापडत नाही. अशा वेळी त्या प्रतिशब्दासाठी अडून बसण्यापेक्षा वाक्याचा भावार्थ नीट मांडला जाईल, अशी वाक्यरचना करावी. दिलेल्या संपूर्ण उताऱ्याचा ‘स्वैर अनुवाद’ करणे मात्र टाळायला हवे.
आशय लेखन :
उताऱ्यातील मुख्य कल्पना, विषय समजून घेत आपल्या शब्दात उत्तर मांडणे अपेक्षित असते.
उताऱ्याची मुख्य/मध्यवर्ती संकल्पना मांडून पुढे उताऱ्यामधील मुद्दय़ांच्या आधारे स्वत:च्या भाषेत स्पष्टीकरण देणे अशा प्रकारे आशयाचे लेखन करणे आवश्यक असते.
यामध्ये शब्दमर्यादा असतेच. सारांश लेखन व आशय लेखनामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे यामध्ये पूर्णपणे स्वत:च्या भाषेत, उदाहरणांसहित वाक्यप्रचार, म्हणी वापरून ‘आशय’ व्यक्त करायचा असतो, तर सारांश लेखनामध्ये जास्त मोकळीक घेता येत नाही.
उताऱ्यावरील प्रश्न :
आधी उतारा वाचून घ्यावा. त्यावेळी वस्तुनिष्ठ माहिती व संज्ञांना अधोरेखित करावे.
पहिल्या वाचनानंतर प्रश्न पाहावेत. काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले असतील तर त्यांची उत्तरे लिहून घ्यावीत.
संकल्पनात्मक व आशय विचारणारे प्रश्न पाहून त्यांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा पुन्हा एकदा वाचावा.
दुसऱ्या वाचनातून आशयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देता येतील. उताऱ्याला शीर्षक देणे, लेखकाचा हेतू, उद्देश अशा प्रकारचे प्रश्न याबाबत विचारले जातात. शीर्षक छोटेसे व समर्पक असावे.
प्रश्नांची उत्तरे स्वत:ची शब्दयोजना
करून लिहावीत. उताऱ्यातून कॉपी-पेस्ट करू नयेत.